सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

क्रेडीट कार्ड नाही? चिंता कशाला, कॅश ऑन डिलीवरी आहे ना

माझ्या एका मैत्रिणीला ग्रीक क्लासिक 'इलीअड' हवं होतं. पण, बिचारी शोधून हैराण झाली; कुठे मिळेच ना. शेवटी मी तिला 'फ्लिपकार्ट'चा पर्याय सुचवला. पण, तिथेही गोची. तिच्याकडे ना क्रेडीट कार्ड आहे ना इ-बँकिंग अकाउंट. पण, सुदैवाने फ्लिपकार्टवर 'कॅश ऑन डिलीवरी'चा पर्याय आहे. त्यामुळे तिची इलीअड घेण्याची हौस अखेर पुरी झाली.

कॅश ऑन डिलीवरी हा खास भारताचा शोध. गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. भारतामध्ये क्रेडीट कार्ड किंवा इ-बँकिंग अकाउंट असणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना इच्छा असूनही ऑनलाईन शॉपिंग करता येत नाही. ह्यावर पर्याय म्हणून आता जवळपास सर्वच इ-वाणिज्य वेबसाईटनी कॅश ऑन डिलीवरीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ह्या पर्यायाचा उपयोग करून घेणाऱ्यांची संख्याही खूप आहे.

आपल्यापैकी अनेक जण ऑनलाईन शॉपिंगपासून दूर राहतात. त्याचं प्रमुख कारण म्हणजे ऑनलाईन शॉपिंगसाठी जे सोपस्कार करावे लागतात, त्याबद्दलची भीती किंवा अनभिज्ञता. बऱ्याच जणांना कॅश ऑन डिलीवरी असा काही पर्याय असतो याची कल्पनाही नसते. पण, ऑनलाईन शॉपिंगचे फायदे बघता, ह्या माध्यमाची लोकप्रियता येणाऱ्या काळात खूप वाढणार आहे आणि त्यामुळे त्याबद्दलची भीती आणि अनभिज्ञताही आपोआपच कमी होईल.

कॅश ऑन डिलीवरीचा सर्वात जास्त फायदा कोणाला झाला असेल, तर तो लहान शहरं आणि ग्रामीण भागातील इंटरनेट वापरकर्त्यांना. ह्या ठिकाणी जो मध्यम आणि उच्च-मध्यम वर्ग आहे, त्याची आर्थिकदृष्ट्या शहरातील मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाशी तुलना करता येईल. त्यांच्या एकुणात जीवनमानाविषयीच्या अपेक्षाही खूप वाढल्या आहेत. पण, ज्या गोष्टी शहरातील लोकांना सहज-सहजी उपलब्ध होतात, त्या त्यांना होत नाहीत. पर्याय? ऑनलाईन शॉपिंग! त्यामुळे ह्या लोकांसाठी, ज्यांच्याकडे क्रेडीट कार्ड आणि इ-बँकिंग अकाउंट असण्याची शक्यता खूप कमी आहे, कॅश ऑन डिलीवरी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०११

जाऊया पायरसीच्या गावा

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक स्टेटस वाचला... "पायरसी सक्स!" मीही त्यावर प्रतिक्रिया लिहिली, "पायरसीला नाही म्हणा!" कुणीतरी एवढी मेहनत करून एखादी कलाकृती निर्माण करते आणि आपण निर्लज्जपणे तिचा फुकट आस्वाद घ्यायचा? जेव्हापासून मला हे पटलंय, तेव्हापासून मी पायरसीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो.

आजकाल आपल्याला जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल बघायला मिळतो. आणि ह्या प्रत्येक मोबाईलमध्ये १००-१५० तरी गाणी असतात. ह्यापैकी किती गाणी विकत किंवा न चोरता घेतलेली असतात? शून्य! तुमच्या कम्प्युटरमधील किती चित्रपट तुम्ही सीडी विकत घेऊन कॉपी केलेले आहेत? दहापैकी नऊ वेळा उत्तर शून्य असेल. आजच्या काळात पायरसीचा स्पर्श न झालेली व्यक्ती मिळणं सुखी माणसाच्या सदऱ्याइतकी दुर्मिळ गोष्ट आहे. बऱ्याचदा लोकांना माहितीच नसतं कि पायरसी असं काही असतं किंवा ती वाईट गोष्ट आहे.

पण खरंच पायरसी वाईट आहे का? त्याने कलाकारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं का?

आपण चित्रपट डाऊनलोड करतो किंवा मित्रांकडून कॉपी करून घेतो. पण, म्हणून आपण थीएटरला जायचं थांबवलंय का? आपण प्रत्येक नवीन चित्रपटाची गाणी एक पैही खर्च न करता डाउनलोड करतो. पण, समजा तशी सोय नसती, तर आपण प्रत्येक नवीन गाण्यांची सीडी विकत घेतली असती नाही ना... असं म्हणूया की आपण सर्व नाही, पण काही सीडीज तरी विकत घेतल्या असत्या. पण, अशा लोकांचं काय, की ज्यांच्याकडे केवळ दोन-तीन हजारांचा मोबाईल आहे. त्यांना परवडणार आहे का हे? मग त्यांनी गाणीच ऐकायचीत नाहीत?

मी इथे पायरसीचं समर्थन करत नाहीये. पायरसी अनैतिकच आहे. जे लोक आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत, त्यांनी तर पायरसीचा आधार घेणे हे एखादी चोरी करण्याएवढंच वाईट आहे. पण, तरीही आपण एक गोष्ट दुर्लक्षित करू शकत नाही; ती म्हणजे पायरसीने केलेलं लोकशाहीकरण. पूर्वी चित्रपट आणि गीते ही फक्त श्रीमंतांचीच मक्तेदारी होती आणि त्यांनाही इच्छा असून प्रत्येक चित्रपट पाहणं किंवा प्रत्येक गाणं ऐकणं शक्य होत नसे. पण पायरसीमुळे एकुणातच चित्रपट-गाणी पाहण्या-ऐकण्याचं प्रमाण खूप वाढलंय. तसंच गरीब-श्रीमंतांमधील ह्या बाबतीतला फरक थोडा का होईना पण कमी झालाय, ही जमेची बाजू.